आज जगभरात पसरलेली महामारी कोविड -१९ मुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक, कार्यालयांची व इतर सर्व कामे ऑनलाईन माध्यमातूनच पार पडत आहेत. पण ज्या प्रमाणे कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचे सुद्धा फायद्याइतकेच तोटे सुद्धा आहेत.
आपल्या सर्वांना लहानपणी शाळेमध्ये केलेल्या खोड्या, तासिका सुरु असताना केलेली मस्ती, गोंधळ करणे आणि या सगळ्यांमुळे शिक्षकांचा मार त्याचबरोबर शालेय परिसरातील खेळ आणि अजून खूप काही हे सगळं सतत आठवत राहते. या अनुभवांमुळे पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांचे शिस्त-कौशल्य वाढवण्यास मदत करते त्याचप्रमाणे एक चांगली वृत्ती, चांगले कौशल्य, शिस्त आणि वक्तशीरपणाही अंगी येतो. परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे पूर्ण शिक्षण ऑनलाईन माध्यमातून असल्याने विद्यार्थी या सर्व गोष्टींपासून दूर जाऊन मोबाईल वर गेम खेळतात म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर दिवसभर डिजिटल मीडियाचा अतिवापराचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर खूप गंभीर पणे होत आहे. पालक जरी आपल्या पाल्यांना शिस्त, वागणूक शिकवत असले तरी त्या मध्ये शिक्षकांनी लावलेल्या सवयीची सर येणार नाही आणि असे जर झाले असते तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्याची गरजच भासली नसती.
तसेच ऑनलाईन शिक्षणाचे फायदे जाणून घ्यायचे झाले तर ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्यांना कधीही आणि कुठेही शिकण्याची मुभा देते. शिकणाऱ्याला अनन्यसाधारण विषयांमध्ये अमर्याद ज्ञान आणि जागतिक तज्ञांचे मार्गदर्शन मिळते, जे अन्यथा न परवडणारे किंवा अनेकांसाठी कल्पनेच्या पलिकडे असते. ऑनलाईन प्रोग्राम्स मोठ्या वयोगटातील मुलांना त्यांच्या स्वतःच्या गतीने, प्रतिबंधांशिवाय आणि त्यांच्या इतर जबाबदाऱ्यांशी तडजोड न करता शिकण्याची मोकळीक देतात. पण शेवटी या सर्व सोईसुविधा असून सुद्धा शाळेतील मित्रांबरोबरील मौज-मस्तीची, विविध अनुभवांमधून शिकलेल्या गोष्टींची कमतरता ऑनलाईन शाळा भरून काढू शकत नाही त्यामुळे असे म्हणावेसे वाटते,
शाळा सुरु असताना वाटे घरून करावी शाळा
पण ऑनलाईन शाळेपेक्षा चांगली माझी शाळा…